पुणे - महापालिकेच्या वतीने शनिवारवाडा परिसरात रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना, पेशवेकालीन पाण्याचा हौद सापडला आहे. या हौदातून पाणी काढण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून, हौदात झऱ्यावाटे येणारे पाणी एकदम स्वच्छ असे आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीचे हे बांधकाम आहे.
शनिवारवाडा परिसरात सध्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम सुरू असताना काही फूट खोलीवर पाण्याचा झरा लागला, थोडे अजून खाणले असता घडीव दगडातील पायऱ्या आणि हौद आढळून आला. या हौदातून हा झरा वाहत असून, झऱ्याचे पाणी अतिशय स्वच्छ असे आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कामांना सुरुवात
दरम्यान सध्या पुण्यातील विविध ठिकाणी महापालिकेच्या वतीने कामे सुरू आहेत. त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र दुसरीकडे पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर खर्च करण्याऐवजी महापालिका इतर कामांसाठी पैसे खर्च करत असल्याची चर्चा पुणेकरांमध्ये सुरू आहे.
हेही वाचा - नाशिक : इंडिया सिक्युरिटी प्रेस १५ मेपर्यंत राहणार बंद