पुणे - पुणे शहरात आजपासून मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. संध्याकाळी 6 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजताच पुणेकर आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. पुण्यातील मुख्य चौकांमध्ये, रस्त्यावर 6 वाजल्यानंतर शुकशुकाट पाहायला मिळाला आहे. पुणे शहरात तब्बल 1 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी संचारबंदीत ड्युटीवर असणार आहेत.
हेही वाचा - पुण्यात आजपासून मिनी लॉकडाऊन; बाजारपेठेत गर्दी झाली कमी
प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत 3 ठिकाणी नाकाबंदी
पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आजपासून मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुणे शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत 3 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची चौकशी करण्यात येणार आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच शासनाच्या नियमावलीनुसार रस्त्यावर असलेल्या नागरिकांनाच सोडण्यात येणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
सुरुवातीला समज नंतर कायदेशीर कारवाई
पुणे शहरात आजपासून संध्याकाळी 6 वाजता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांनाच शहरात चौका- चौकात करण्यात आलेल्या नाकाबंदीतून सोडण्यात येणार आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांना सुरुवातीला समज दिली जाणार आहे आणि मग नंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.अशी माहिती पूणे पोलीस आयुक्त डॉ.अमिताभ गुप्ता यांनी दिली.
हेही वाचा - पुण्यातील 'पीएमपीएमएल' बससेवा सुरू ठेवा - खासदार बापट