पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा (Padma Awards) करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe) यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वैद्यक क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून डॉ. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली. त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी या आश्रमाला भेटी दिल्या आहेत.
- बालाजी तांबे यांचा अल्पपरिचय -
डॉ. बालाजी तांबे यांचा जन्म २८ जून १९४० रोजी झाला होता. बालाजी तांबे यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव वासुदेव तांबे शास्त्री असे. बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांनी आयुर्वेद शिकवला होता. पुढे बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळविली. १० ऑगस्ट २०२१ रोजी वयाच्या 81 व्या वर्षी डॉ. बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन झाले.
- डॉ. बालाजी तांबे यांचे कार्य -
डॉ. बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेज याचे संस्थापक होते. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळवली होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले होते.
- आयुर्वेद आणि योग शिक्षणातून परिवर्तन -
डॉ. बालाजी तांबे यांनी आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतले होते. ऑगस्ट 2021 मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे पुण्यात निधन झाले. लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात बालाजी तांबे यांचे मोठे योगदान होते. डॉ. बालाजी तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रचार व प्रसार केला. शास्त्रशुद्ध आणि गुणत्तापूर्ण आयुर्वेदीक औषधांची संशोधन निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य त्यांनी केले. त्यातून विविध समाजघटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेदाचा प्रसार त्यांनी परदेशातील नागरिकांपर्यंतही पोहचवला. परदेशातील नागरिकही त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून कार्ल्यात येत होते.
बालाजी तांबे यांनी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातूनही आयुर्वेदाचा प्रसार केला. सोप्या भाषेत त्यांनी अनेक पुस्तके लिहली आहेत. तांबे यांनी 'गर्भसंस्कार' या पुस्तकाचे लेखन केले. त्यांच्या या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. या पुस्तकाच्या लाखोप्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.