पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिंचवड पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त केलेली आणि बेवारस वाहने वर्षानुवर्ष धूळ खात पडलेली होती. त्यांच्या मूळ मालकांचा शोध चिंचवड पोलिसांनी घेतला असून एकूण 65 वाहन त्यांच्या मूळ मालकांना परत मिळणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी माहिती दिली आहे. यासाठी चिंचवड पोलिसांनी गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली. चिंचवड पोलीस ठाण्यात संबंधित मूळ मालकाचे नाव, वाहनांचा प्रकार आदी देण्यात आले आहे.
विविध पोलीस ठाण्यात शेकडो वाहन
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात विविध पोलीस ठाण्यात शेकडो बेवारस आणि गुन्ह्यात जप्त केलेली वाहने गेली कित्येक वर्षे झाले धूळ खात पडून आहेत. मात्र, यावर पोलीस अधिकारी, कर्मचारी फारसे गंभीर नसल्याचे नेहमीच दिसते. परंतु, चिंचवड पोलीस ठाणे अपवाद ठरले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दोन महिन्यांपूर्वी चिंचवड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या तळमजल्यात धूळखात पडलेल्या 80पेक्षा अधिक वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला.
चिंचवड पोलीस ठाण्यात वाहने जमा
संबंधित वाहन, बेवारस आणि गुन्ह्यात वापरलेली असून ती चिंचवड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलेली असून ती वर्षानुवर्ष धूळखात पडलेली आहेत. वाहनांच्या मूळ मालकाचा शोध घ्यायचे असे चिंचवड पोलिसांनी ठरवले होते. त्यानुसार, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सुधाकर काटे, विश्वजित खुळे यांनी गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेऊन मालकांचा शोध लावत वाहनांची ओळख पटवून, पुरावे देऊन परत घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शोध लावण्यात आलेल्या 65 वाहनांच्या मालकांची नावे, वाहन क्रमांक, वाहनांचा प्रकार, आदी चिंचवड पोलीस ठाण्यात लावण्यात आले असून संबंध वाहन मालकांनी खात्री करून वाहन परत घेऊन जाण्याचे आवाहन चिंचवड पोलिसांनी केले आहे.