पुणे - पुणे जिल्ह्यातील तसेच पेठांमधील शाकाहारी नागरिकांना राहण्यासाठी पुणे सातारा रोड वर उद्योगपती बाबूभाई नानावटी आणि त्यांच्या मित्र मंडळींनी मिळून पुण्यातील श्री आदिनाथ गृहरचना मर्यादित सोसायटीची 1964 साली स्थापन केली. या सोसायटीच्या प्रत्यक्ष बांधकामाला 1967 साली सुरुवात करण्यात आली. सर्व धर्मीय मात्र शाकाहारीच असलेल्या नागरिकांना या सोसायटीमध्ये फ्लॅट देण्यात आले आहेत. तब्बल 400 फ्लॅट असलेल्या या सोसायटीमध्ये गेल्या 50 वर्षांपासून केवळ शाकाहारीच नागरिक राहत आहेत.
त्या काळातील अशियामधील सर्वात मोठी को- ऑपरेटिव्ह सोसायटी
1964 मध्ये आदिनाथ सोसायटीची स्थापना करण्यात आली, 1967 साली सोसायटीच्या बांधकामाला सुरुवात झाली, या सोसायटीमध्ये 400 फ्लॅटची निर्मिती करण्यात आली, ही सोसायटी त्यावेळी भारतातीलच नव्हे तर अशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी म्हणून ओळखली जात होती. 1660 च्या काळात पुण्यात फक्त पेठांमध्ये लोक वसलेले होते. शहराच्या इतर भागात जंगल होते. त्याकाळी 400 घरे तेही एका सोसायटीत आणि ते ही शहराबाहेर म्हटलं तर लोकांना आश्चर्य वाटत होते.
सोसायटीत 400 फ्लॅट 50 दुकाने
आदिनाथ सोसायटीत एकूण 20 बिल्डिंग असून एका बिल्डिंगमध्ये 20 फ्लॅट असे चारशे फ्लॅट आणि 50 दुकाने आहे. आदिनाथ सोसायटीतील सर्व घरांची रचना पर्यावरणपूरक करण्यात आली आहे.
सोसायटीमध्ये दोन मंदिरे
आदिनाथ सोसायटीत विविध धार्मिक सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतात. नवरात्र, गणेश उत्सव, गणेश जन्म तसेच विविध धर्मीय सण देखील मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. सोसायटीमध्ये दोन मंदिरे आहेत, एक अंबामाता मंदिर तर एक जैन मंदिर दोन्ही मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात सण उत्सव साजरे केले जातात. तसेच सोसायटीचे एक गणेश मंडळ देखील आहे, गणेशोत्सवाच्या काळात सोसायटीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. तसेच सोसायटीमध्ये एक महिलांचे भजणी मंडळ देखील आहे.
लहान मुलांसाठी उद्यान
या सोसायटीमध्ये एक उद्यान देखील आहे, या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी विविध खेळणी बसवण्यात आल्या आहेत. लहान मुलांसोबतच मोठी मानसे देखील सकाळ- संध्याकाळ वॉकसाठी या उद्यानात येत असतात.