पुणे - शहराजवळील पिंपरी-चिंचवडमध्ये एक्स रे मशीनचा स्फोट होऊन एक वर्षीय चिमुकली जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. शार्वी भूषण देशमुख असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत मुलीची आई आणि आजोबा देखील किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या एक्स रे सेंटर आणि डॉक्टर विरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे.
हेही वाचा... विक्रोळीतील कन्नमवार नगरात घरफोडी, १ लाखाहून अधिक सोन्याचा ऐवज लंपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलीला घेऊन तिची आई आणि आजोबा MCU टेस्ट करण्यासाठी न्यूक्लेस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेले होते. टेस्ट सुरू झाली, तेव्हा अचानक एक्सरे मशीनचा काचेचा भाग फुटून आवाज झाला, तसेच मशीनमधून धूर आणि केमिकल बाहेर निघाले. फुटून आवाज झाल्याने मशीन मधील केमिकल हे लहान मुलीच्या अंगावर उडाले. यात ती जखमी झाली. तर आई आणि आजोबांच्या देखील अंगावर केमिकल उडाल्याने ते देखील किरकोळ जखमी झाले आहेत. डॉक्टर आणि एक्स रे सेंटरच्या हलगर्जीपणा विरोधात शार्वीच्या आई वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.