पुणे - सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर टपरी चालकाच्या पोटावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शहरातील बाणेर रोड परिसरात घडली. संतोष कदम (वय 32), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा भुसावळात क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून; आरोपीने धारदार शस्त्राने केले गळ्यावर वार
पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रस्त्यावरील डी-मार्ट जवळ संतोष कदम याची टपरी आहे. रविवारी सायंकाळी तिघेजण या टपरीवर गेले आणि त्यांनी सिगारेट मागितली. पैसे मागितल्याचा राग आल्याने आरोपीने संतोष कदमला मारहाण केली. यानंतर एकाने कोयत्याने त्याच्या पोटात वार केल्याने संतोषचा मृत्यू झाला.
हेही वाचा परतूरमध्ये भरदिवसा तरुणाचा खून; दहा दिवसांतील दुसरी घटना
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केला असून, याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. चतु:शृंगी पोलीस संबंधित घटनेचा पुढील तपास करत आहेत.