पिंपरी-चिंचवड - प्रसिद्ध कलादिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी सोनाली सापते यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आर्थिक आणि मानसिक त्रास दिल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असे तक्रारीत म्हटले आहे.
चंदन ठाकरेला बेड्या
या प्रकरणी नरेश विश्वकर्मा(मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे वय- 36, अशोक दुबे हे सर्व मुंबईमध्ये राहतात. यापैकी चंदन ठाकरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
'मानसिक, आर्थिक त्रास देऊन आत्महत्येला भाग पाडले'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपींनी नियोजनबद्ध कट रचून राजेश सापते यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, लेबर लोकांना कामावर येऊ देणार नाही, व्यवसायीक नुकसान करण्याच्या धमक्या देऊन वारंवार जबरदस्तीने १० लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये १ लाखांची मागणी केली होती. तसेच त्यापोटी त्यांनी अडीच लाख रुपये जबरदस्तीने देण्यास भाग पाडले. असे सोनाली यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच राजेश यांचे बिझनेस पार्टनर चंदन ठाकरे याने वेळोवेळी विश्वासघात व फसवणूक करुन आर्थिक नुकसान केले असल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये आहे. आरोपींच्या जाचाला कंटाळल्याने राजेश मारुती सापते यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून आरोपींनी राजेश यांना मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा - परवानगी नसताना सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चास सुरुवात; पोलिसांचा मोठा फौजफाटा