पुणे - पुण्यातील औंध परिसरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मयूर मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले होते. मयूर मुंडे यांनी स्वखर्चाने उभारलेल्या या मंदिरात नरेंद्र मोदींची मूर्ती देखील बसवण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले होते. परंतु हे मंदिर आता बंद करण्यात आले. या मंदिरातील नरेंद्र मोदींचा पुतळा देखील हटवण्यात आला आहे. पीएमओ कार्यालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर हे मंदिर हटवले असल्याचे बोलले जात आहे. तर याच बाबीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील औंध परिसरात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मयूर मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मंदिर उभारून आतमध्ये मूर्ती बसवली होती. नरेंद्र मोदींचे व्यापक कार्य पाहून आपण हे मंदिर उभारले असल्याचे तेव्हा त्याने सांगितले होते. परंतु सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर बुधवारी रात्री या मंदिरातून हा पुतळा हटवण्यात आला. त्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदींच्या या मंदिरासमोर आंदोलन देखील करण्यात आले होते. हा पुतळा का हटवला याचे स्पष्टीकरण आता मंदीर उभारणाऱ्या मयूर मुंडे यांच्या वतीने अॅड मधुकर मुसळे यांनी दिले आहेत. मुसळे म्हणाले, नरेंद्र मोदींचा पुतळा बसवल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांचा आम्हाला फोन आला. त्यांनी सांगितले की एखाद्या जिवंत व्यक्तीचे मंदिर बांधून त्यांची पूजा करणे हे भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेत बसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असलेल्या भावना या रस्त्यावर मंदिर बांधून व्यक्त न करता त्या भावना मनातच ठेवाव्यात, असे वरिष्ठ नेत्याने सांगितले होते. त्यानंतर आम्ही हा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला. सध्या हा पुतळा औंध भागातील नगरसेवकांच्या पक्ष कार्यालयात ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे आंदोलन
या प्रकरणावरून आता पुण्यामध्ये राजकारण रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरच्या वतीने आज या पुतळा नसलेल्या मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, चार दिवसांपूर्वी एका अंध भक्ताने नरेंद्र मोदींच्या मंदिराची उभारणी केली होती. त्यानंतर पुणे शहर भाजपाच्या वतीने शहरात अशी काही वातावरण निर्मिती केली कि हे मंदिर उभारल्यानंतर पुणे शहरातील संपूर्ण प्रश्न चुटकीसरशी सुटतील. मंदिरातील या देवासाठी आम्ही आज पेट्रोल, डिझेल, केरोसिन, खाद्यतेल यासारखे देवाचे आवडते पदार्थ आम्ही त्यांना नैवेद्य म्हणून आणले होते. परंतु मंदिरातून हा दैवत चोरीला गेला आहे. नरेंद्र मोदी नामक देवांमध्ये पुणे शहरातील प्रश्न सोडवण्याची ताकद नाही, त्यामुळे हा देव रुसून गेला आहे. हा देव रुसून गेल्यामुळे पुण्यातील भाजपाची मंडळी उपोषणाला बसणार आहे, भाजपाच्या आमदार खासदार यांच्या विनंतीला मान देऊन तरी हरवलेला देव पुण्यात परत येईल ,अशी आशा आहे, असा उपरोधिक टोला प्रशांत जगताप यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा - पुण्यातील नरेंद्र मोदींच्या 'त्या' मंदिरातील मूर्ती रातोरात हलवली