पुणे - पाच वर्षांपासून मला भाजपची पक्षात येण्यासाठी ऑफर आहे. विधानसभेत भाजपच्या अनेक मंत्र्यांनी तुम्ही आमच्याकडे पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. पण शरीरात प्राण असेपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या जयंत पाटील यांनी आज मुलाखती घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. '५ वर्षांपूर्वीच मला भाजपतर्फे ऑफर देण्यात आली होती. इतक्यात अशी काही ऑफर नाही. मात्र, अशी ऑफर आली तरी माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी पवारांना सोडणार नाही. सत्तेला, लोभाला आणि मोहाला बळी पडून अनेकांनी पक्ष सोडला असेल, अशी लोकं गेली तरी मला फरक पडत नाही. माझ्यापुढे पवारांचा आदर्श आहे. आम्ही पुन्हा एकदा लोकांपुढे जाऊ आणि जोमाने पक्ष उभा करू,' असे ते यावेळी म्हणाले.
'पुण्यात सर्व मतदार संघासाठी आम्ही अर्ज मागवले होते. यावेळी ६५ उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्या सर्वांच्या मुलाखती होतील आणि त्यानंतर निर्णय होईल. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार आहे. राजीनामा देणाऱ्यांची किंवा पक्ष सोडून जाणाऱ्यांची पक्षावर नाराजी नाही. ज्यांना निवडून येण्याची खात्री नाही तेच पक्ष सोडून जात आहेत. जनता पवारांना मानणारी आहे. तेच त्यांना पुन्हा निवडून देतील,' असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.