पुणे - भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय नागरिक हा हिंदू आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्र प्रथम राष्ट्र सर्वोतोपरी या कार्यक्रमात म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. एक नवीनच गोष्ट त्यांनी सांगितली आहे, की या दोन्ही समाजाचे मूळ जन्म हे एकाच कुटुंबात झालं आहे. माझ्याही ज्ञानात भर पडली आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला आहे.
पुण्यात साधना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेचे ते बोलत होते.
ईडी कारवाईने राज्याच्या अधिकारावर एका प्रकाराची गदा -
या दोन ते तीन वर्षात देशातील नागरिकांना एक नवीन यंत्रणा माहीत झाली आहे ती म्हणजे ईडी आणि ती ईडी कोणाच्या मागे कोणत्या पद्धतीने लागेल हे माहीत नाही. अकोल्याच्या भावना गवळी यांच्या तीन ते चार संस्था आहेत आणि त्याचा व्यवहार हा 20 ते 25 कोटीच्या आसपास आहे. ईडी त्यांना त्रास देत आहे. जिथे गैरव्यवहार झाला असेल तिथे आपल्या देशात त्या-त्या कमेंटी आहेत आणि तिथं जाऊन तक्रार देऊ शकतो. आज शिक्षण संदर्भात खोलात जाऊन त्याचा तपास करण्याची यंत्रणा असताना ईडी त्याठिकाणी जाऊन हस्तक्षेप करत आहे. अशा प्रकारच्या हस्तक्षेपाने राज्याच्या अधिकारावर एका प्रकाराने गदा येत आहे. पार्लमेंट सुरू झाल्यानंतर सर्वांना विश्वासात घेऊन मांडणार आहोत, असंही यावेळी पवार यांनी सांगितले. लोकशाहीत अधिकऱ्यांचे लोकप्रतिनिधीशी संपर्क असणे हे चुकीचं नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना काही अधिकारी माझ्याशी देखील मिळत होते. अधिकाराचा गैरवापर होत असेल तर ते चुकीचं आहे, असं ही यावेळी पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा - भारतातील हिंदु, मुस्लिमांचे पूर्वज एकच - मोहन भागवत
विरोधकांना नाउमेद करण्यासाठी ईडी -
कायदेशीर लढाईत भाष्य करणे योग्य नाही. पण या पद्धतीने इतक्यात वर्षात महाराष्ट्रात इतक्या ईडीच्या कारवाई ऐकल्या आहेत का, अनेक लोकांवर ईडी कारवाई करत आहे. हल्ली हे एक साधन म्हणून विरोधकांना नाउमेद करण्यासाठी सुरू आहे. असं यावेळी पवार यांनी सांगितले.
या पुढे अशा कार्यक्रमाला जाणार नाही -
जुन्नरला जाण्याआधी मी आयोजकांना विचारले की, तुम्ही सर्व गोष्टीची परवानगी घेतली का, कोरोना प्रोटोकॉल पाळणार आहात ना, पण फक्त स्टेजवर सोशल डिस्टनसिंग पण समोर लोक चिटकून बसलेले होते. हे योग्य नाही. यापुढे अशा प्रकारचे कार्यक्रमच स्वीकारणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केले आहे ते योग्य आहे आणि मी यापुढे काळजी घेणार आहे. हजारोच्या पुढे यापुढे कार्यक्रम करणार नाही गेलो तर हॉलमध्ये जिथे कोरोनाचे नियम पाळले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी भीती दाखवली आहे त्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे यावेळी पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा - बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा संपर्क तुटला, उपचाराअभावी चिमुकल्या आरुषीचा जीव गेला
सामान्य माणसाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने देखील अत्यंत घातक -
काही ठराविक बँका या देशात राहतील याची काळजी घेतली जात आहे. हे संबंध सहकाराच्या दृष्टीने चुकीचं आहे पण सामान्य माणसाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने देखील अत्यंत घातक आहे. आज रिझर्व्ह बँकेचं सर्व सहकारी बँकेकडे बघण्याचा दृष्टीकोन जे घेत आहे ते योग्य नाही. सहकारी बँकेतील सभासदांचा अधिकार आहे का बँक कोणाच्या हातात द्यायची. सहकारी बँकेच्या व्यवहारात सरकारने किती हस्तक्षेप करावा याबाबत देखील सूत्रे ठरवले गेले पाहिजे याबाबत राज्य सरकारच्या लेव्हलवर चर्चादेखील सुरू आहे, असं देखील पवार यावेळी म्हणाले.