पुणे - जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन नेतृत्वाची फळी राज्यात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदा या नेतृत्व तयार करणाऱ्या शाळा आहे. पुणे जिल्हा परिषदेमधून २४ जिल्हा परिषद सदस्य, ५ सदस्य मंत्री झाले आहेत, ही गौरवास्पद बाब आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जिल्हा परिषदेचे काम महत्त्वाचे - जिल्हा परिषदेची इमारत अत्यंत चांगली आहे. या इमारतीमधून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल होणारे काम व्हावे. महिलांना आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांची संख्या वाढली आहे. राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जिल्हा परिषदेचे काम महत्त्वाचे ठरणार आहे. पुणे जिल्हा परिषदेने ६० वर्षात केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्अजित पवार म्हणाले, की सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी १९६२ साली स्थानिक स्वराज्य संस्था अस्तिवात आल्या. तेव्हापासून पुणे जिल्हा परिषदेने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास झाला पाहीजे. त्यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक असतात.