पुणे - महाराष्ट्रात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माझे नाव घेतल्याशिवाय शांत झोप लागत नाही. मोदी यांचे ठीक आहे, पण शाह यांचे काय? असा चिमटाही त्यांनी काढला. लोक तुमच्या बरोबर आहेत तर, मोदी यांना 8 ते 9 सभा, शाह यांना 20 सभा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा का घ्यावा लागत आहेत, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. आपले राजकारण चालणार नाही. निवडणुकीत यश मिळण्याची खात्री नाही. त्यामुळेच या सभा होत असल्याचा हल्लाबोल पवारांनी केला.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी जाहीर सभा आयोजित केली होती. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार कमल ढोले पाटील आदी या सभेला उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, मोदी आणि शहा मला 370 वर का बोलत नाही, म्हणून सवाल उपस्थित करीत आहेत. पण, राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्यात, औद्योग धंदे बंद पडताहेत, बेरोजगारी वाढतेय, महिलांवर अत्याचार वाढतायेत, या सर्वांवर उत्तर केवळ 370 दिले जात आहे. नाबार्ड सरकारी बँका, कारखाने, आजारी बँकांना मदत करते. या संचालकांशी माझे संबंध असल्याचे नाबार्डने म्हटले. या संचालकांशी माझे चांगले संबंध राहणारच असा विश्वास पवार यांनी आज व्यक्त केला. सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी करायचा असतो. ईडी, सीबीआय या संस्थेने पानसरे, कुलबुर्गी प्रकरणाचा तपास करावा. मात्र, सत्ताधारी त्याचा वापर विरोधकांवर कारवाई करण्यासाठी करत आहेत.