पुणे - चाणक्याशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल. समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे केले ( Governor Koshyari Controversial Statement ) होते. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद उफळला आहे. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या गुन्हावर दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी पुणे पोलिसांना दिले आहे.
पुणे पोलिसांना दिलेल्या पत्रात विकास लवांडे यांनी म्हटलं की, महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी कार्यरत असलेले भगतसिंह कोश्यारी यांनी युगपुरुष व राज्याचे आराध्य दैवत असणारे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह व आमच्या भावनांना ठेच लागेल, असे विधान जाणीवपुर्वक केले आहे. अशाप्रकारे छत्रपती शिवरायांचा अवमान करत जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोरील क्रीमीनल अर्ज क्र. 995/2008 मध्ये दि. 16 जुलै 2018 रोजी न्यायालयाने सुस्पष्ट निकाल दिला असताना, छत्रपती शिवरायांना कमी लेखण्याचे व त्यांचे महान कतृत्व नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच उद्देशाने भगतसिंह कोश्यारी यांनी अक्षम्य गुन्हा केला आहे.
वास्तविक भारतीय संविधान व सर्व कायद्वे देशातील सर्वांना एकसमान पध्दतीने लागू आहे. राज्याच्या महत्वाच्या स्थानी कार्यरत असलेले श्री. कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून गुन्हा केला आहे. आम्ही राज्यपाल पदाचा पुर्ण आदर व सन्मान ठेवत आहोत. मात्र, वैयक्तीकरित्या श्री. भगतसिंह कोश्यारी यांचेवर तक्रार नोंदविण्यासाठी विनंती करीत आहे, असे पत्र विकास लवांडे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला दिले आहे.
अन्यथा फिरु देणार नाही
या पद्धतीचे राज्यपाल महाराष्ट्राला मिळणे हे राज्याचे दुर्दैव आहे. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. हे निषेधार्थ आहे. राज्यपालांनी पुण्यात येण्यापुर्वी या जनतेची माफी मागावी, अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
हेही वाचा - Sambhaji Brigade : राज्यपाल माफी मागा! अन्यथा, संभजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने धडा शिकवेल - डॉ. शिवानंद भानुसे