पुणे - 'नही चाहिये अच्छे दिन, लौटादो हमारे पुराने दिन' अशी घोषणाबाजी करत वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. बालगंधर्व चौक येथील राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर जनआक्रोश आंदोलन करत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईत वाढ..
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महागाई वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांत गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १४० रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलने १०५ रुपये प्रति लीटरचा आकडा ओलांडला आहे. इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. आधीच कोरोनासारख्या साथरोगामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिक या कोरोनामुळे पूर्णपणे पिचले गेले आहेत. अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने धोरण आखून महागाई नियंत्रणात आणण्याची गरज आहे. परंतु, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.
सर्वसामान्य जनता केंद्रातील मंत्र्यांना रस्त्यांवर फिरू देणार नाही..
आज केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ होत आहे. एकीकडे जनता कोरोना सारख्या महामारीने त्रस्त असताना सर्वसामान्य नागरिकांना धीर देण्याऐवजी सातत्याने सरकार प्रत्येक वस्तूमध्ये वाढ करत आहे. अशीच जर परिस्थिती पुढे राहिली तर सर्वसामान्य जनता केंद्रातील या मोदी सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा देखील यावेळी जगताप यांनी दिला.