पुणे - राज्यात सत्ता स्थापण करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र ही आघाडी कायमस्वरूपी नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही - पटोले
चुकीच्या नियोजनामुळे देशातील कोट्यावधी युवक बेरोजगार झाले आहेत. वाढत्या महागाईमुळे देशातील महिला त्रस्त आहेत. तर शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले समर्थन मुद्दे हे देखील नाममात्र आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा प्रकार आहे. त्यामुळे या सर्वांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन देखील केले आहेत. आगामी काळात मोदी हटाव देश बचावचा नारा देऊन काँग्रेसचा संकल्प आम्ही पुढे नेणार आहोत, देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. आम्ही स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे, असंही यावेळी नाना पटोले यांनी म्हटले आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात मोफत लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनासाठी ते आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार - पटोले
नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली असून, काँग्रेस आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्यासाठी काँग्रेसने तयारी देखील केली आहे. काँग्रेस या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. आपला पक्ष उभा करणे त्याला ताकदीने पुढे नेणे प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे. कॉंग्रेस पक्ष देखील तेच करत आहे. रोज वेगवेगळ्या पक्षातील लोक काँग्रेसमध्ये येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पटोलेंचा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा
भगवान श्रीरामाचे नाव घेऊन सुरू असणारे 'राम राम जपणा और पराया माला अपना' ही गोष्ट आता समोर आली आहे. राम मंदिर ट्रस्टने देखील त्यांच्यावर आरोप केले आहेत. यातील खरी माहिती आता लोकांसमोर आली आहे. भगवान श्रीरामाचे नाव पुढे करून कोणाची पोटे भरली जात आहेत हे लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भगवान श्रीराम कोणाला शिक्षा देतील हे लवकरच कळेल, अशी अप्रत्यक्ष टीकाही यावेळी नाना पटोले यांनी भाजपावर केली आहे.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये रेशनचा काळाबाजार; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त