पुणे - पर्वती मतदारसंघात विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आपण दहा वर्षे दिली आहेत. भाजपची देशात आणि महाराष्ट्रात सत्ता आहे . पुणे महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता असून सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक आमदारांना आपण काय विकास केला? हे जर सांगता येत नसेल तर पर्वती मतदारसंघात भाकरी फिरविण्याची हीच योग्य वेळ आहे . असे मत खासदार डॉ . अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले .
राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( कवाडे गट ), मनसे मित्रपक्ष महाआघाडी उमेदवार नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाआघाडी व मित्र पक्षाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले, " सत्ताधारी भाजपा रडीचा डाव खेळत आहे . देशांमध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरू असून या निवडणुकीमध्ये देशाचे मुद्दे मतदारांच्या पुढे करून भावनिक राजकारण केले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री समोर पैलवान नाही आणि कुणाचेही आव्हान नसल्याचे सांगून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत . महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षातील केलेल्या कामाचा आलेख जनतेपुढे मांडावा. मॅग्नेटिक महाराष्ट्राचे काय झाले ? मेक इन इमहाराष्ट्राचे काय झाले? किती महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळाला? या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्र्यांना विचारत आहे.
पुणे शहराने सत्ताधारी भाजपाला आठ आमदार दिले. तरीही पुण्याची मेट्रो नागपूरला जाते. 370 कलम पुढे करून देशाच्या मुद्द्यावर राज्याची निवडणूक लढविली जात आहे. 370 कलम रद्द झाल्यामुळे पुणे शहराची वाहतूक कोंडी कमी होणार नाही. तरुणांना रोजगार मिळणार नाही. पर्वतीमध्ये नगरसेविका आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून अश्विनी नितीन कदम यांनी केलेल्या कामाचा सर्व पर्वतीकर नागरिकांना अभिमान आहे. त्यांनी केलेल्या कामाचा संपूर्ण पुणे शहरामध्ये गौरव केला जातो. आता त्यांना आमदार करा त्या असे काम उभा करतील की, पर्वती विधानसभा मतदारसंघाचा हेवा संपूर्ण महाराष्ट्राला वाटल्याशिवाय राहणार नाही. यावेळी नागरिक महिला आणि युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात होते.