पुणे - कोरोनामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तींना हा तरुण दररोज मदत करायचा, अन्नदान करायचा. मात्र, हे करत असताना त्यालाही कोरोना विषाणूची बाधा झाली. तसेच त्याच्या आईला देखील कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, या तरुणाने स्वतःही न डगमगता आपल्या ५२ वर्षीय आईला समजावून सांगत उपचार घेण्यास तयार केले. आज हे दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा... केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
हे दोघे मायलेक पुण्यातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत होते. आईसाठी त्याचा जीव कासावीस होत होता. आईची काळजी त्याला सतावत होती. दोघांचे वार्ड वेगवेगळे होते. परंतु, १४ दिवसांच्या अहवालानंतर दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोघांनीही करोनावर मात केली आहे.
या दोघांनाही एका दिवसाच्या अंतराने करोनाने गाठले होते. आईचे वय जास्त असल्याने मुलाला तिची काळजी वाटत होती. तर आईचे सर्व लक्ष हे मुलावर होत. दोघांचे वॉर्ड वेगवेगळे असल्याने मन रमत नव्हते. परंतु, डॉक्टर्स आणि तेथील कर्मचाऱ्यांनी खूप सहकार्य करत त्यांच्यावर चांगले उपचार केले, असे या कोरोनामुक्त तरुणाने सांगितले.
समोर गेट असल्याने या दोघांनाही एकमेकांच्या वॉर्डमध्ये जाता येत नव्हते. त्यामुळे दोघेही समोरासमोर असून भेटू शकत नव्हते. अवघ्या दहा फुटांचे अंतर ओलांडणे मुलाला आणि आईला शक्य नव्हते. मात्र, मुलाला आईची काळजी जास्त होती. त्यामुळे तो दुरुनच तिच्यालोबत बोलत होते. आईच्या तब्बेतीची विचारणा करत होता. असे साधारणपणे १४ दिवस सुरू होत. ते एकमेकांना प्रोत्साहन देण्याचे काम करत होते. त्यामुळेच १४ दिवसानंतर दोघांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे.
हेही वाचा... #coronavirus : पुणे विभागात आतापर्यंत 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे; विभागात तब्बल 3 हजार 242 पॉझिटिव्ह रुग्ण
'नागरिकांनी कोरोना झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. डॉक्टर्स दिवसरात्र आपल्यासाठी काम करत आहेत. तर अनेक नागरिक कोरोना झाला असेल तर, बाहेर निघत नाहीत. घरात लपून बसलेले आहेत. त्यांनी घराबाहेर येऊन रुग्णालयात जावे, जेणेकरून पहिल्या टप्प्यात तुम्ही बरे व्हाल. उशीर केला तर तो जीवावर बेतू शकतो' असे आवाहन देखील या तरुणाने नागरिकांना केले आहे.