पुणे - महावितरणकडून आकारल्या जाणाऱ्या वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज पुण्यात आंदोलन केले जाणार होते. पुण्यातील शनिवारवाडापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही शेकडो कार्यकर्त्यांची शनिवारवाडा परिसरात एकत्र येऊन मोर्चा काढण्यासाठी तयारी सुरू होती. मात्र, यावेळी मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दोन तास चाललेल्या नाट्यमय घडामोडीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही सोडून देण्यात आले.
मनसेच्या कार्यकर्त्यांचा फरासखाना पोलीस स्टेशनसमोर ठिय्या
पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे, माजी नगरसेवक किशोर शिंदे, अजय शिंदे, माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया, सुरेखा मकवाना यांच्यासह आजी माजी पदाधिकाऱ्यांना फरासखाना पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले होते. त्यानंतर संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, दोन तासानंतर पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा संपला. तत्पूर्वी फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. जमावाच्या गर्दीमुळे आप्पा बळवंत चौक, शिवाजी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा - वाढीव वीजबिलांविरोधात मनसेचे पालघरमध्ये आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
हेही वाचा - ठाण्यात मनसेचे वीजबिल आंदोलन पेटले; मनसैनिक-पोलीस आमनेसामने