पुणे - रुग्णवाहिका मिळत नसल्याने पुण्यातील मनसे नगरसेवकाने उपायुक्तांची गाडी फोडली आहे. पुणे शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, लोकांना अंत्यविधीसाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे. यासोबतच रुग्णालयातून स्मशानभूमीमध्ये मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे संतप्त झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेच्या व्हेईकल डेपोचे उपायुक्त नितीन उदास यांची चक्क गाडी फोडली. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पालिकेच्या आर्ट गॅलरीमध्ये घडली.