पुणे - विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी 6 पैकी 5 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाला धुळे-नंदुरबारची एकमेव जागा मिळाली. नागपूर, पुणे, औरंगाबाद यांसाख्या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. या विजयानंतर पुण्यात महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत बालगंधर्व चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल 20 वर्षांनंतर भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलंय. या मतदारसंघातून अरुण लाड हे 49 हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत.
हा एकजूटीचा विजय
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा विजय आहे. राज्यातील जनतेचा सरकारवरील विश्वास असल्याचे हे प्रतिक आहे, असे आमदार चेतन तुपे म्हणाले. जनतेचा हाच कौल असेल, तर पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका याच पद्धतीने लढणार, असे ते म्हणाले.
चंद्रकांत दादांनी कोथरूडमधून पुन्हा एकदा निवडून दाखवावं
महाविकास आघाडीत किती आणि भाजपासोबत किती घटक पक्ष आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी पाहावं. त्यांची एकत्रित लढण्याची इच्छा असेल, तर चंद्रकांत पाटलांनी कोथरूडमधून पुन्हा लढावं, आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असे आव्हान तुपे यांनी दिले आहे.
पेढे वाटप करत साजरा केला आनंदोत्सव
विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने 6 पैकी 5 जागा जिंकल्याने पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसचे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.