पुणे - प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके त्यांचा तपास करत होती. परंतु आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी गौतम पाषाणकर यांना जयपूर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे.
गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला, आणि ते घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिसमधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले.
गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली. तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासून व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी लिहिलं होतं. यानंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला. विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.
...अखेर जयपूरमधून ताब्यात
तपासादरम्यान पोलिसांनी पाच ते सहा पथकं स्थापन करून राज्यातील वेगवेगळ्या शहरात त्यांचा शोध सुरू केला. काही दिवसांपूर्वी ते कोल्हापूरमध्ये असल्याचेही निष्पन्न झाले होते. परंतु त्यानंतर ते पुन्हा गायब झाले. आज अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना जयपूर येथील एका हॉटेलमधून सुखरुप ताब्यात घेतले आहे.