पुणे - पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare death) यांच्या निवासस्थानी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे (babasaheb purandare family) सांत्वन केले. यावेळी शिवशाहीर पुरंदरे यांचे सुपुत्र प्रसाद पुरंदरे यांच्याशी बोलताना त्यांनी बाबासाहेबांविषयीच्या स्मृतींना उजाळा दिला. ठाणे येथे आयोजित सत्कार सोहळा तसेच महानाट्य 'जाणता राजा' बाबतच्या आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या.
इतिहासाविषयी अभिमान, सत्यात सत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा - वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होते. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्लेषण क्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच, सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये आम्हाला जवळून अनुभवता आली, अशी भावना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
कोण आहेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे?
‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare Passes Away) यांचे आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, कार्य, कर्तुत्व सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी केले. बाबासाहेबांनी शिवचरित्रातून शिवराय महाराष्ट्रातच नव्हे तर, देश-विदेशात पोहोचवले. जाणून घ्या त्याविषयी सविस्तरपणे...
छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने -
बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 मध्ये झाला होता. पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड हे आहे. मात्र, तरुणपणापासून ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1761’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित -
महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan )प्रदान केला होता. पण त्यावेळी यावरुन बराच गदारोळ झाला होता. त्यांना हा पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी थेट कोर्टात याचिका देखील करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने ती याचिका देखील फेटाळून लावली होती. ज्यानंतर त्यांना पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन आणि जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षांत 1250 हून अधिक प्रयोग झाले आहेत.
शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास -
इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहुणे श्री.ग.माजगावकर यांच्याबरोबर ते 'माणूस'मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
जाणता राजा या महानाट्याची निर्मिती -
पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षांत 1250 हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग 14 एप्रिल, इ.स. 1984 रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. 'जाणता राजा' मध्ये 150 कलावंत काम करतात आणि याशिवाय हत्ती घोडे यांचाही रंगमंचावर वावर असतो. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी 10 दिवस आणि उतरवण्यासाठी 5 दिवस लागतात.
हेही वाचा - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास