पुणे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभागाच्या माध्यमातून पुढील वर्षीपासून संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शासनाच्यावतीने पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde on Sant Ravidas Maharaj award ) यांनी केली.
हेही वाचा - पिंपरीत तृतीयपंथी यांच्यासोबत अनोखा 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा
संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडे यांनी शिवशंभूनगर येथील गुरू रविदास महाराज मंदिरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपायुक्त उमेश सोनवणे, नगरसेवक प्रकाश कदम, अखिल भारतीय रविदाशिया धर्म संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर, रतनलालजी सोनाग्रा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी पुस्तकांचे दालन ठेवण्यात आले, तसेच बार्टीच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
येणाऱ्या काळात ऊसतोड कामगारांना निधी जाहीर करण्यात येईल
ऊसतोड कामगारांच्या बाबतीत महामंडळ हे आत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने चालायला लागले आहे. आज ऊसतोड मजूर कारखान्यावर असून सर्व ऊसतोड कामगारांची नोंदणी झाली पाहिजे. त्यांना त्यांचे ओळखपत्र दिले पाहिजे आणि एकूण ऊसतोड कामगारांची संख्या किती आहे याबाबत आज बैठक आयोजित करण्यात आली असून, या माध्यमातून येणाऱ्या काळात ऊसतोड कामगारांना महामंडळाच्यावतीने निधी जाहीर करण्यात येईल, असे देखील यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.