पुणे - पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाकडून पाचवी ऑनलाइन सोडत 22 जानेवारीला होणार आहे, त्या आधी अर्ज भरण्याची मुदत 11 जानेवारीपर्यंत असणार आहे. एकूण 5 हजार 647 घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. पुणे म्हाडाच्या इतिहासात यावेळची सोडत ही सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात आहे. या 22 जानेवारीला सकाळी 9वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडणार आहे, अशी माहिती म्हाडाचे कार्यकारी अधिकारी नितीन साने यांनी दिली आहे.
आत्तापर्यंत 53 हजार 492 जणांकडून रजिस्ट्रेशन
२२ जानेवारीला पुणे म्हाडाची ही पाचवी ऑनलाइन सोडत असून त्यात म्हाडाची ३१८८ व २०टक्के सर्वसमावेशक योजनेचे १४३० व पंतप्रधान आवास योजने अंतर्गतचे ९६१ असे एकूण ५५७९ सदनिका व ६८ भूखंडाची सोडत होणार आहे. म्हाडामधून घर मिळावे यासाठी 1 लाख 16 हजार जणांनी विझिट केल असून आत्तापर्यंत 53 हजार 492 इतके रजिस्ट्रेशन झाले असून पुढील चार दिवसात आणखीन वाढण्याची शक्यता आहे. असे म्हाडाचे कार्यकारी अधिकारी नितीन साने यांनी यावेळी सांगितलंय.त्यामुळे सामान्य पुणेकरांच घरं घेण्याच स्वप्न पूर्ण होणार आहे.
म्हाडाकडून कोणत्याही एजंटची नेमणूक नाही
पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे (इंगळे) चाकण एमआयडीसी लगत येथील सदनिकांच्या किंमती सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव 20 टक्के कपात करून कमी व वाजवी किंमतीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ही सोडत ऑनलाइन असून पूर्णपणे पारदर्शी आहे. म्हाडाने कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. संगणकीय सोडतीमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही. त्यामुळे अर्जदारांनी जास्तीत जास्त या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत ७८७६ सदनिकांची काढण्यात आली सोडत
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली व पुणे या जिल्ह्यांचा समावेश होतो. आत्तापर्यंत पुणे मंडळाने सन २०१६पासून आत्तापर्यंत ४ ऑनलाइन सोडत काढली असून त्यात मंडळाचे ४१५४ सदनिका व २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ३७२२ सदनिका, असे एकूण ७८७६ सदनिकांची सोडत काढली असून याचे वितरणही केले आहेत.