पुणे - राज्यात शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षंपासून जोरदार टीका आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर हे सरकार बनले नसते. बाळासाहेबांनी अशा खुर्चीला लाथ घातली असती, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातो. त्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला. हे सरकार बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे. ही बाळासाहेबांचीच भूमिका होती, असे यावेळी संजय राऊत म्हणाले. त्याला शरद पवार (Sharad Pawar) यांनी दुजोरा दिला आहे.
पुण्यात महाराष्ट्र कनेक्ट काँक्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची ज्ञानेश महाराव यांनी मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कन्हैया कुमार, मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते.
सरकार व्यवस्थित सुरू आहे - या मुलाखतीच्या सुरुवातीलाच पवार यांना महाविकास आघाडीबद्दल विचारण्यात आले तेव्हा पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार लोकांच्या प्रश्नासाठी एकत्र आले आहे आणि आता महाविकास आघाडी सरकारचे काम हे व्यवस्थित सुरू आहे, असे देखील या वेळी पवार म्हणाले.
ब्रिजनभूषण मॅनेज होणारा नाही- राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱयाला विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह यांना तुम्ही मॅनेज केले असा प्रश्न पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, ब्रिजभूषण सिंह यांना कुणी मॅनेज करु शकेल अशी व्यक्ती नाही. कुस्तीच्या क्षेत्रात आम्ही एकत्र काम करतो, पण प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. त्यांना मॅनेज करण्यात आले हे डोक्यातून काढून टाका, ते मॅनेज होणाऱ्यांपैकी नाही, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
हेही वाचा - OBC Reservation Issue : एकदाची जातनिहाय जनगणना कराच; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान
सामर्थ जर कोणामध्ये असेल तर ते शरद पवार यांच्यात - शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा अडीच वर्षांचा जो आग्रह होता तो जर भाजपाने मान्य केला असता, तर अडीच वर्ष संपली असती. आता तुमची पुढील अडीच वर्षे सुरू झाली आहेत, असा कसे वाटत आहे? यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी साधारण आमची जी देवाणघेवाण सुरू होती, तेव्हाच माझ्या डोक्यात सुरू होते की हे काही शब्दाला जागणारे लोक नाहीत. मी शरद पवारांशी नेहमी संपर्कात असतो, त्यांना म्हणालो की काहीतरी बदल महाराष्ट्रात व्हायला हवा. महाराष्ट्रात बदल करण्याचे सामर्थ जर कोणामध्ये असेल तर ते शरद पवार यांच्यात आहे. या गोष्टी निकालाच्या अगोदरच्या मी सांगतोय, याचा अर्थ भाजपाला आम्ही फसवायला निघालो होतो असे नाही. परंतु, त्यांची जी वृत्ती होती, याचा मी एक फार मोठा अभ्यासक आहे. त्यामुळे मला माहीत आहे की हे काय करू शकतात, हे काय करणार हे मी आताही सांगू शकतो. दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेना देखील या महाराष्ट्रात एक वेगळी भूमिका घेऊ शकते आणि शिवसेनेसोबत इतर प्रमुख पक्ष येऊन या राज्याला एक वेगळी दिशा आणि नेतृत्व देऊ शकतात, हे जेव्हा दाखवण्याची संधी आली, तेव्हा मला असे वाटते की सगळ्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला, असे देखील यावेळी संजय राऊत म्हणाले.
देशामध्ये देखील बदल घडवण्याची ताकद आपल्या राज्यात - मला अजूनही खात्री वाटते की महाराष्ट्रातील हा प्रयोग हा असाच सुरु राहीला, तर देशामध्ये देखील बदल घडवण्याची ताकद आपल्या राज्यात आहे. मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रात अनेक राजकीय संकटं विविध माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण कोणी वाकलं किंवा झुकलं नाही. आपण लढतो आहोत, हा लढणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षे देखील सुखरुप पार पडतील आणि त्या नंतरच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपाने विरोधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी ठेवावी, हे मी खात्रीने सांगतो. असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.
सिनेमात काश्मीरमधली खोटी स्थिती दाखवली - 'द काश्मीर फाईल्स' सिनेमावर शरद पवारांनी भाष्य केले. हा सिनेमा देशातील जनमानसाच्या मनावर वेगळा परिणाम करण्याच्या उद्देशाने तयार केला गेला. सिनेमात काश्मीरमधली खोटी स्थिती दाखवली गेली. त्याच्यात काश्मीरी पंडितांची हत्या केल्याचं दाखवलं गेलं. या काळात केंद्रात भाजपच्या समर्थनाचं सरकार होतं. आणि आज केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी भाजप वेगळ्या काही उपाययोजना करत नाही. पण अश्या सिनेमांच्या माध्यमातून खोटा इतिहास दाखवून लोकांची दिशाभूल केली जाते. धर्माधर्मात तेढ निर्माण केला जातोय, असे देखील यावेळी शरद पवार म्हणाले.
याचे उत्तर 2024 नंतर त्यांना कळेल - ईडीच्या धाडी फक्त भाजप विरोधकांवरच का पडतात असे जेव्हा राऊत यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, याचे उत्तर 2024 नंतर त्यांना कळेल. वक्त हमारा भी आएगा. म्हटल तर याचा त्रास होतो म्हटले तर नाही. याला मै झुकेगा नही साला, असे यावेळी राऊत म्हणाले.
आधी माझ्या मतदारसंघातील पन्नास टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो - तुमची स्मरणशक्ती इतकी दांडगी कशी? असे जेव्हा पवार यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, मी यशवंतराव चव्हाण यांच्याकडून हे शिकलो. त्यांचे राजकारण आणि समाजकारण यशस्वी होण्यास ज्या गोष्टी कारणीभूत आहेत, त्यामधे एखाद्या व्यक्तीचा पहिल्या नावाने उल्लेख करणे हे होते.एकदा माझ्या मतदारसंघातील एक महिला मी मुख्यमंत्री असताना तिचे काम घेऊन ती मुंबईत आली. मी तिला म्हटले कुसुम काय काम काढले, मी नावाने हाक मारल्यावर ती तीचे कामच विसरुन गेली आणि गावाकडे सगळ्यांना सांगितले की मला साहेबांनी नावाने ओळखले. आधी माझ्या मतदारसंघातील पन्नास टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो, आता तसे नाही. आता त्याने आजोबांचे नाव सांगितले की कळते हा कोणाचा आहे, असे यावेळी पवार म्हणाले.
त्यासाठी आपले नानं खणखणीत हवं - ईडीमुळे कितपत त्रास होतोय.असे पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, हे गंभीर आहे. मला जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा मी म्हटलं की मीच येतो, मग ईडीचे अधिकारी हात जोडत आले की तुम्ही येऊ नका. त्यासाठी आपले नानं खणखणीत हवं, असे यावेळी पवार म्हणाले.
हे चुकीचं आहे - आज एखाद्याची नास्तिकता- आस्तिकता तपासली जाते.हे बरोबर आहे का असे जेव्हा पवार यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की हे बरोबर नाही. मी एखाद्याची कशावर श्रद्धा आहे की नाही याचा कधीच विचार केला नाही. मी पंढरपुरात गेलो तर पांडूरंगासमोर हात जोडतो. कारण महाराष्ट्रातील करोडो कष्टकऱ्यांची विठ्ठलावर श्रद्धा आहे. करोडो लोक विठ्ठलाला संकटमोचक मानतात. त्यांच्या श्रद्धेला केलेला तो नमस्कार असतो, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
रोहित पवार नामदार होणार का - रोहित पवार नामदार होणार का? असे जेव्हा पवार यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, मी 1967 ला आमदार झालो तेव्हा मला नामदार व्हायला पाच वर्षं थांबावं लागलं होतं, असे म्हणत पवार यांनी रोहित पवार यांच्या मंत्रिपदाबाबत यावेळी असे भाष्य केलं.