पुणे - महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील नऊ दिवसात या ठिकाणी तब्बल 2 हजार 829 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यावर्षी 22 आणि 23 जुलै रोजी सर्वाधिक म्हणजेच 480 आणि 574 मिमी इतका प्रचंड पाऊस पडला आहे. हवामान विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार महाबळेश्वर मध्ये जुलै महिन्यात 2064.4 मिलिमीटर इतका पाऊस होतो. यावर्षी मात्र 19 जुलै पासून ते आतापर्यंत 2829 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये 22 आणि 23 जुलै रोजी अनुक्रमे 480 आणि 574 मिमी पाऊस झाला आहे.
महाबळेश्वरमधील पावसाची नोंद -
- 19 जुलै - 97.8
- 20 जुलै - 109.8
- 21 जुलै - 164.0
- 22 जुलै - 480.0
- 23 जुलै - 594.4
- 24 जुलै - 321.0
- 25 जुलै - 186.7
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढला. यामुळे पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्प घेऊन येणारे ढग महाबळेश्वर परिसरातील डोंगररांगांना धडकले जात होते. एकाच जागी हे ढग एकत्र जमल्याने या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला गेला. त्यामुळेच महाबळेश्वरमध्ये कमी वेळात विक्रमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर खालोखाल रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातही मागील नऊ दिवसात सर्वाधिक मिमी पाऊस झाला आहे. महाबळेश्वरात मागील काही दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे महाबळेश्वर पाचगणी या मुख्य रस्त्यावरील वेण्णालेक नजीक सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शेतीसह अनेकांच्या घरात आणि या परिसरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये हि पाणी गेले होते. सातारा जिल्ह्यात असलेल्या महाबळेश्वरमध्ये कोयना, कृष्णा, सावित्री, गायत्री आणि वेणा पाच नद्या उगम पावतात. यंदाच्या वर्षी बाबळेश्वर मध्ये जोरदार पाऊस झाला आणि या नद्यातील पाणी मोठ्या प्रमाणात कोकणात गेल्याचे बोलले जाते.