पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकाडाऊनमुळे मागील 2 ते 3 महिन्यांपासून खासगी प्रवासी बससेवा बंद आहे. सरकारने खासगी बससेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा यावर अवलंबून असलेले हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती खासगी बस व्यावसायिक आणि कर्मचारी यांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहर आणि परिसरात साधारण 800 ते 900 खासगी बस या दररोज व्यवसाय करणाऱ्या आहेत. पुण्यातून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागात, खानदेश तसेच गुजरात आणि मध्यप्रदेश पर्यंत या बसेसच्या दररोज फेऱ्या होत असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व खासगी बस एका जागी उभ्या आहेत. तसेच या व्यावसायावर अवलंबून असलेले चालक, क्लिनर, बुकिंग घेणारे असे आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे हजारो नागरिक अडचणीत आले आहेत.
हेही वाचा... पेट्रोल डिझेलच्या महागाईचा भडका थांबेना; जाणून घ्या आजचे दर
मागील अडीच ते तीन महिन्यांपासून हा व्यवसाय संपूर्णतः ठप्प झाला आहे. बस मालकांनी आता काही प्रमाणात आपल्या लोकांना सांभाळले. मात्र, हे व्यावसायिक देखील हातघाईला आले आहेत. बस व्यवसाय लवकर सुरु व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. दररोज धावणाऱ्या आठशे ते हजार बसेस आणि टूरसाठीच्या काही बसेस अशा पुण्यात साधारण दहा ते बारा हजार खासगी बसेसमधून वाहतूक होत असे.
हेही वाचा... सोयाबीन उगवण क्षमेतेप्रकरणी समिती गठित, दोषींवर कडक कारवाई - कृषी मंत्री
लॉकडाऊनमध्ये आर्थिक फटका बसल्यामुळे या खासगी बस व्यावसायिकांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने या वाहतूकदारांना पन्नास लाखांचे विमा संरक्षण देत रोड टॅक्स, जीएसटी रद्द करावा, अशी मागणी केली जात आहे.