पुणे - शुक्रवारी म्हणजे उद्या जगभरात ख्रिश्चन समाज बांधव 'गुड फ्रायडे' ( Good Friday ) हा दिवस दुखवटा म्हणून साजरा करतात. बायबलनुसार, येशूंनी आपले बलिदान दिले, तो दिवस शुक्रवार होता. त्यामुळे या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते, असा प्राथमिक इतिहास सांगितला जातो. या दिवशी जगभरातील ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. चर्चमध्ये या दिवशी विशेष प्रार्थनांचे आयोजन केले जाते.
म्हणून साजरा केला जातो गुड फ्रायडे - ख्रिस्ती धर्माचा पवित्र ग्रंथ बायबलनुसार, येशूंनी आपले बलिदान दिले म्हणून हा दिवस साजरा केला जातो, अशी अखयायिका आहे. जगात अनेक ठिकाणी हा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्यात येतो. त्यात एक विशेष गोष्ट म्हणजे या दिवशी कोणत्याही चर्चमध्ये घंटानाद केला जात नाही. लाकडी काठीने केवळ छोटा आवाज केला जातो. ख्रीश्चन धर्मातील लोक या दिवसाला 'होली फ्रायडे' किंवा 'ब्लॅक फ्रायडे' असेही म्हणतात. कारण याच दिवशी येशूंनी आपले बलिदान दिले होते. म्हणून हा दिवस काळा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी सगळे ख्रिश्चन बांधव काळ्या रंगाचे कपडे परिधान करून चर्चमध्ये प्रार्थना करतात. आपल्या गुन्ह्यांची माफीच जणू यादिवशी येशूकडे मागितली जाते. येशू समाजाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी क्रॉसवर चढले. समाज आणि मानवतेसाठी काम करण्याची प्रेरणा यातून मिळते, यासाठी या दिवसाला 'गुड फ्रायडे' म्हटले जाते, अशी देखील या समाजात एक मान्यता आहे.
येशुंचा तो शेवटचा क्षण - येशूंनी सतत समाजाला फक्त प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालण्याच्या संदेश दिला. मात्र, लोकांनी तरी देखील त्यांच्यावर मोठे अन्याय केले. अनन्वित यातना दिल्या एवढच नाहीतर त्यांना क्रॉसवरदेखील चढवण्यात आले. नंतर येशूना काट्यांचा मुकूट घालण्यात आला. तरीदेखील आपल्या शेवटच्या क्षणी येशूंनी शेवटी आपला श्वास सोडताना,'हे ईश्वरा... या सर्वांना माफ कर. ते नेमके काय करीत आहेत, याची जाणीव त्यांना नाही', असे अंतिम शब्द येशूचे होते, असे देखील संगितले जाते. चर्चमध्ये करण्यात येणारा घंटानाद गुड फ्रायडेच्या दिवशी केला जात नाही. कारण आहे ते येशुंच्या मृत्यूचे. पण या दिवशी सगळ्या चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केले जाते. या दिवशी प्रसाद म्हणून गोड चपात्या खायची परंपरा देखील आहे.
गुड फ्रायडे नंतर येतो इस्टर संडे - शुक्रवारी येशूंनी आपला जीव सोडला. मात्र, असं देखील सांगितलं जातं की दोन दिवसांनी रविवारी लगेचच येशू पुन्हा जीवंत झाले. त्या दिवशी रविवार होता. म्हणूनच संपूर्ण जगभरात गुड फ्रायडेनंतर येणार रविवार ईस्टर संडे म्हणून साजरा करण्यात येतो.
हेही वाचा - Devendra Fadnavis : इशरत जहाँ, रझा अकादमी, मुंबई बॉम्बस्फोट.. १४ ट्विटद्वारे फडणवीसांचा शरद पवारांवर हल्ला