पुणे - केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी सोमवारी पुण्यातल्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या आर्मी रोईंग नोड आणि आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटला भेट दिली. क्रीडा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रिजीजू यांनी रोईंग नोडला पहिल्यांदाच भेट दिली. तर आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटला त्यांनी आज दुस-यांदा भेट दिली. यावेळी मंत्री रिजीजू यांनी रोईंगच्या प्रशिक्षणाची कार्यपद्धती जाणून घेतली तसेच तिथे सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी केली.
सध्याच्या कोरोना काळामध्येही ज्या समर्पित भावनेने गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे, ते पाहून देशाचे क्रीडा क्षेत्रातले भविष्य उज्ज्वल आहे, असा आत्मविश्वास असल्याचे किरेन रिजीजू यावेळी सांगितले. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सर्व खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील, असेही ते म्हणाले.
आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये मंत्री रिजीजू यांनी राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या काही मान्यवर नेमबाजांशी संवाद साधला. यामध्ये पाच अर्जुन पुरस्कार विजेते आहेत. यापैकी तीन जणांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. या संस्थेत उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण सुविधेचे मंत्री रिजीजू यांनी कौतुक केले. संस्थेला आवश्यक असणारी आर्थिक मदत पुरविण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
हेही वाचा - पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा 'हृदय संगीत' हाऊसफुल्ल
हेही वाचा - शिरूर तालुक्यात 30 वर्षीय तरुणावर गोळीबार; तरुणाचा मृत्यू