पुणे - यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी सनई चौघडे, ढोल ताशांचा गजर आणि असंख्य कार्यकर्त्यांसह मिरवणूक नसली तरी उत्साहपूर्ण वातावरणात अगदी साधेपणाने पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आणि मंडळाच्या सदस्यांनी बाप्पाच्या मूर्तीची पूजा करून प्रार्थनाही केली. पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींची प्राण प्रतिष्ठापना पूर्ण झाली. यामध्ये मनाच पहिला कसबा, दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी, तिसरा म्हणजेच गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरी वाडा दिमाखात विराजमान झाले.
खासदार बापटांच्या हस्ते कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना -
पुण्यातील पहिला मानाचा श्री कसबा गणपती मंडळाच्या बाप्पाचे आगमन झाले आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही मंडळाने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संकट वाढू नये यासाठी नागरिकांनी देखील ऑनलाईनच्या माध्यमातून बाप्पाचे दर्शन घ्यावे असे आवाहन देखील मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी केले आहे. मानाचा पहिला कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात पार पडली.
गुरुजी तालीम गणेश मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना -
पुण्यात मानाचा तिसरा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुरुजी तालीम गणेश मंडळातील गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे सदस्य यांच्याशी बातचीत पृथ्वीराज श्यामसिंग परदेशी गुरुजी केली. अगदी छोट्या स्वरूपात गणपतीची मिरवणूक काढून गणपतीचे आगमन झाले. श्रींची पूजा करून त्यांची प्राणप्रतिष्ठापना यावेळी करण्यात आली.
तुळशीबाग गणपती मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना -
पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी पावणे एकच्या दरम्यान करण्यात आली. यावेळी श्री तुळशीबाग गणपती मंदिरात मंदिराभोवती आकर्षक घंटी महलाची सजावट सरफारे बंधुंनी साकारल आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांनी यंदाच्या गणेशोत्सवातील विविध उपक्रमाचा आनंद घ्यावा. तसेच यंदाचा गणेशोत्सव शिल्पकारांच गणपती या मालिकेतून तुळशीबाग मंडळात जडण घडण झालेल्या कलाकारांच्या मुलाखतींना देखील अनुभव पुणेकरांनी घ्यावा, असे आव्हान देखील मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपती मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही साधेपणाने मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपती मंडळाच्या गणपतीचे आगमन करण्यात आले. मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणेशोत्सवाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 11 वाजता डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते करण्यात आली. रमणबाग चौकातील गोखलेवाड्यातून परंपरेनुसार मानाच्या पालखीतून ‘श्रीं’ची मूर्ती केसरीवाड्यात आणण्यात आली. त्यानंतर सनई-चौघड्यांच्या मंगलमय सुरावटीत विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक, व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, विशवस्त डॉ. प्रणिती रोहित टिळक उपस्थित होते. केसरी गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम भक्तांना ऑनलाईन पाहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.
हेही वाचा - Ganeshotsav 2021: 'जे अमंगल आहे, ते नष्ट होवो'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गणराया चरणी प्रार्थना