पुणे - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात कारवाईत सहभागी असणाऱ्या किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. गोसावी याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. हा गोसावी कोण आहे? आणि त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस का जारी करण्यात आली? हे जाणून घेण्यासाठी वाचा ईटीव्ही भारतचा हा रिपोर्ट.
हेही वाचा - पुण्यात 14 वर्षीय युवतीची निर्घूण हत्या; शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी घेतली मुलीच्या आई-वडिलांची भेट
कोण आहे गोसावी?
क्रुझ ड्रग प्रकरणात एनसीबीने काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह अन्य काही जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातच गोसावी याला एनसीबीने साक्षीदार बनवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावरून एनसीबीवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे, गोसावी वादात अडकला. त्यातच त्याच्या विरोधातील काही फसवणुकीची प्रकरणेही समोर आली आहेत.
नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर पुणे पोलिसांनी गोसावी याचा शोध सुरू केला. गोवासीवर फरासखाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पण, अद्याप तो हाती लागलेला नाही. तो परदेशात पळून जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. त्याला परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी ही नोटीस बजावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे गुन्हा?
किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती. गोसावी याने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी, अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्यास मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार आहे. त्यामुळे, आता फरासखाना पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
किरण गोसावी विरोधात पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याची तक्रार आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसवले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसही त्याच्या मागावर आहेत.
हेही वाचा - पुण्यात 14 वर्षीय युवतीची निर्घूण हत्या; शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी घेतली मुलीच्या आई-वडिलांची भेट