पुणे - जगभरात तीन कोरोना लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. या लस आपापल्या देशांच्या नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक देश ताकद पणाला लावू लागला आहे. भारतातही लस पोहचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार कामाला लागले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्यावतीने कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार
राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्यावतीने कोरोना लसीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 45 हजार 753 कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य प्रमुख वैशाली जाधव यांनी दिली.
एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख वेळ कळवण्यात येणार
कोरोनाची लस जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस दिली जाणार आहे. यासाठी काही टप्पे ठरविण्यात आले आहेत. यानुसार सुरुवातीला कोरोनाची लस ही आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरिअरना दिली जाणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाईल. या यादीत ज्यांची नावे असतील त्यांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळवले जाणार आहे. याचबरोबर या मेसेजमध्ये लसीकरण करणारी संस्था, आरोग्य सेवकाचे नाव असणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस कधी मिळणार याचीही माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल. जेव्हा दोन्ही डोस दिले जातील तेव्हा एक डिजिटल QR आधारित सर्टिफिकेट दिले जाणार आहे. हा लसीकरण झाल्याचा पुरावा असणार आहे. या साऱ्या तयारीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. यामध्ये कोरोना लसीचा स्टॉक, वितरण, लसीकरण आदी ट्रॅक केले जाणार आहे.
50 जणांना देण्यात येते ट्रेनिंग
महापालिकेच्यावतीने 15 क्षेत्रीय कार्यालयाद्वारे पहिल्या टप्प्याची तयारी सुरु आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार 50 जणांना ट्रेनिंग देण्यात येत आहे. तसेच 5 - 5 जणांची टीम करण्यात येणार असून, याद्वारे कोरोना लसीकरण केलं जाणार आहे, असेही यावेळी वैशाली जाधव म्हणाल्या.
3 ते 4 लाख व्हॅक्सिन स्टोर करू शकतो
पुणे महापालिकेच्यावतीने कोरोना लसीची पूर्वतयारी करण्यात आली आहे.कोरोना लस स्टोर करण्यासाठी तशी तयारीही करण्यात आली आहे. एकाच वेळी 3 ते 4 लाख लस स्टोर करू शकतो अशी तयारी महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. अद्याप लसीकरणाची तारीख कळवण्यात आलेली नाही. कोरोना लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या असल्यातरी शासनाकडून अद्याप कोरोना लसीकरणाची तारीख कळवली नाही. मात्र, जेव्हा याबाबतच्या सूचना मिळतील त्यानंतर लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.