पुणे- आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा सरकारच्या निर्णय म्हणजे रुग्णांच्या जीवनाशी खेळ असल्याची टीका आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केली आहे. आयएमएचा आजचा देशव्यापी संप यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
काही दिवसापूर्वी सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या संस्थेने परिपत्रक काढत आयुर्वेदात पदव्युत्तर शिक्षण केल्यास शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी दिली गेली. सरकारने 58 प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आयुर्वेद डॉक्टरांना परवानगी दिली गेली आहे. यामध्ये साध्या शस्त्रक्रियेशिवाय मेंदूच्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने आज हा बंद पुकारला होता.
रुग्णांच्या प्राणावर बेतणार-
याबाबत बोलताना आयएमए महराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, की हा संप सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत चालला होता. या काळात केवळ कोविड, आपत्कालीन, प्रसुती या सेवा सुरू राहिल्या होत्या. सरकारचे आदेश हे रुग्णांवर अन्यायकारक आहेत. शस्त्रक्रिया ही नाजूक गोष्ट आहे. सखोल अभ्यासाचा विषय आहे. एमबीबीएसमध्ये अॅलोपॅथी डॉक्टरांना सखोल शिक्षण मिळालेले असते. चांगले गुण मिळाल्यास त्यांनी पुढील शिक्षणासाठी परवानगी मिळते. अनुभवी सर्जनशील डॉक्टरच्या हाताखाली शिक्षण घेतलेले असते. आयुर्वेद शास्त्राला विरोध नाही. मात्र, ते पूर्णपणे वेगळे शास्त्र आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी म्हणजे जनतेच्या आरोग्यावर व प्राणावर बेतणार आहे. त्यासाठी आमचा संप आहे. आयुर्वेद शास्त्राला आमचा विरोध नाही. मात्र, त्याची सरळमिसळ केली तर आयुर्वेदाची वाढ होणार नाही. त्यामध्ये संशोधन केले नाही तर जनतेला हितकारक ठरेल. मात्र, अशा निर्णयाने सर्वच शाखांची वाढ खुंटेल, अशी त्यांनी भीती व्यक्त केली. अॅलोपॅथिक शस्त्रक्रियेची नावे संस्कृत नावे दाखवून सरकारने तशी परवानगी दिली आहे.
आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी सरकार देणार प्रशिक्षण-
नवीन नियमानुसार आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना सध्या शस्त्रक्रिया बाबत शिकवले जाते. पण ते एखादी शस्त्रक्रिया करू शकतात की नाही याबाबत कुठलीही स्पष्ट नियमावली नव्हती. परंतु केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या नव्या निर्देशानुसार आयुर्वेदाचे डॉक्टरही शस्त्रक्रिया करू शकणार आहेत. कारण सरकारने दिलेल्या निर्देशानुसार आयुर्वेदाच्या पदव्युत्तर परीक्षेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डोळे, कान, नाक आणि घशाच्या शस्त्रक्रियेसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या संपामुळे आज दिवसभरात दवाखाने बंद होते.