पुणे - लग्नानंतरही एकत्र राहण्यास टाळाटाळ करणाऱ्या पतीचा संतापलेल्या पत्नीने चाकूने गळा चिरून खून केला. पुण्यातील नऱ्हे परिसरात सोमवारी पहाटे ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी 24 वर्षीय पत्नीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आणि आरोपी सांगली जिल्ह्यातील आहेत. 2016 पासून ते पुण्यात राहतात. आरोपी पत्नी एका नामांकित रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते, तर मृत पती एका खासगी कंपनीत कामाला होता. नऱ्हेत भाड्याच्या घरात ते एकत्र राहत होते. एकत्र राहत असताना दोघांमध्येही शरीरसंबंध आले होते. यातून ती गरोदरही राहिली होती. आरोपी महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. पण तो लग्न करण्यासाठी टाळाटाळ करू लागला. काही दिवसांपूर्वी तो पुणे सोडून निघूनही गेला होता. त्यामुळे संतापलेल्या महिलेने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. याप्रकरणी त्या तरुणाला पोलिसांनी अटकही केली होती.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर मृत व्यक्तीने आळंदीत जाऊन तिच्याशी लग्न केले आणि पुन्हा ते एकत्र राहू लागले. यादरम्यान मृत पतीने घटस्फोट घेण्यासाठी तिच्या मागे तगादा लावला. यावरून त्यांच्यात रोज भांडणे होऊ लागली. सोमवारी मध्यरात्रीही त्यांच्यात भांडण झाले. रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, रात्र झाल्यानंतर तो तसाच झोपी गेला. त्यानंतर जागी असलेल्या आरोपीने चाकूने त्याचा गळा चिरला. स्वतःही गळफास घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तिने सिंहगड पोलीस ठाणे गाठत खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा -
'मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा सरकारसमोर आलाच नाही, विरोधकांनी उगाच 'एनर्जी' फुकट घालवू नये'
दहावीचा पहिलाच पेपर फुटला; जळगावात मराठीची प्रश्नपत्रिका व्हायरल