पुणे - गणेश म्हणजे बुद्धीची देवता, गणपती म्हणजे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती, अशा या गणरायाची विविध रूपं आहेत. गणपतीच्या मनमोहक विविध आकाराच्या, रुपांच्या मूर्ती आपल्या संग्रही असणे हे भाविकांसाठी नेहमीच समाधान देणारी बाब असते. मात्र गणरायाच्या मूर्ती संकलन करत असताना एक-एक करत तब्बल साडे पाच हजार पेक्षा जास्त गणेशमूर्ती आपल्या संग्रही ठेवणारा गणेश भक्त विराळाच म्हणावा लागेल. पुण्यातील ज्येष्ठ नागरिक प्रमोद तांबे असे त्या गणेश भक्ताचे नाव आहे.
गणपतींचे वास्तव्य एकाच घरात पुण्यातल्या सदाशिव पेठेत राहणारे प्रमोद तांबे हे 79 वर्षांचे ग्रहस्थ गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून गणरायाच्या विविध मूर्ती, फ्रेम, पोस्टर, किचेन जमा करत आहेत. आज मितीला त्यांच्या घरात हजारो गणेश मूर्ती आणि त्याही वैविध्यपूर्ण विविध रुपातील, विविध आकाराच्या, विविध रंगाच्या विराजमान आहेत. तांबे यांचा पुण्यातील सदाशिव पेठेत वाडा आहे. या वाड्याची एक मोठी खोली गणरायाच्या या विविधरंगी विविध रुपी मूर्तीनी खच्च भरलेली पाहायला मिळते.
पाच हजार गणपतींचे वास्तव्य एकाच घरात 1985 पासून करताहेत संग्रह-तांबे यांनी 1985 पासून या गणेशांच्या मूर्ती, फोटो, कीचैनच्या संग्रहाला सुरुवात केली. त्यांच्या घरात असलेला लाकडी गणपती हा या संग्रहातील पहिला गणपती पुण्यातूनच त्यांनी या लाकडी गणपतीची मूर्ती पहिल्यांदा आपल्या नव्या वाड्यासाठी खरेदी केली होती. लाकडातील ही सुबक मूर्ती बघणाऱ्याला आकर्षित करून घेते अतिशय सुबक अशी ही मूर्ती भरीव लाकडात तयार करण्यात आली आहे. या पहिल्या लाकडी मूर्तीनंतर तांबे कुटुंबीयांना गणपतीच्या मूर्ती जमा करण्याचा हळु छंदच लागला आणि भारतातून, महाराष्ट्रातून ज्या ठिकाणाहून शक्य होईल त्या-त्या ठिकाणावर तांबे यांच्या घरात गणपतीच्या मूर्ती दाखल होऊ लागल्या.
गणरायाची विविध रूप, आकार-यातल्या अनेक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत ओमकार गणेश, वाद्यवृंद करणारे गणेश, क्रिकेट खेळणारे गणेश, संगीत ऐकणारे गणेश, माता पार्वती सोबत असलेला बाल गणपती, अशा एक ना अनेक रुपात गणपतीच्या मूर्ती तांबे यांच्या गणेश मूर्ती संग्रहालयात पाहायला मिळतात. तांबे कुटुंबीयातील प्रत्येकाने या संग्रहात आपला काही न काही हातभार लावलेला आहे.