पुणे - सुल्ली डील अॅपवर ( Sulli Deals App ) मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच, सीआयडी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
हेही वाचा - Chandrkant Patil Critisize MVA Government : राणे महाविकास आघाडीतील सगळ्यांना पुरून उरतील - चंद्रकांत पाटील
अॅप सुरू करून त्यावरून एका विशिष्ट समाजाच्या महिलांबद्दल लिहिले जाते, हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. तसेच, ट्विटरकडून देखील याची माहिती येत आहे. पण, मी या प्रकरणात एकच सांगू शकतो की, या संदर्भात जो काही गुन्हा दाखल करण्यात आला त्यात चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 4 जानेवारी रोजी संस्थेच्या मांजरी बुद्रुक येथील कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री, तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री बोलत होते.
अनेक पुरस्करांची करण्यात आली घोषणा
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 4 जानेवारी रोजी संस्थेच्या मांजरी बुद्रुक येथील कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सभेस राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिला जाणाऱ्या अनेक पुरस्कारांची घोषणा या वेळी करण्यात आली.
नियम सर्वांना एकच
राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. नागरिकांनी नियमावलीचे पालन करावे. काही नागरिकांच्यावतीने नियमांचे पालन केले जात नाही. लग्न समारंभ असो की, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नेते मंडळी असो की, सर्वसामान्य नागरिक सर्वांना नियम बरोबरच आहेत. स्थानिक प्रशासनाला त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे, असे देखील पाटील यावेळी म्हणाले.
कोरोना वाढत असल्याने बैलगाडा शर्यत रद्द
बैलगाडा शर्यत जेव्हापासून बंद झाली, तेव्हपासून सर्वांनी प्रयत्न केले की, ही शर्यत सुरू व्हावी आणि आत्ता न्यायालयाने सशर्त परवानगीने शर्यत सुरू करण्याबाबत परवानगी दिली होती. आणि त्यानंतर आंबेगाव येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. पण, वाढत्या कोरोनाच्या पर्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, जिल्हाधिकारी यांनी बैलगाडा शर्यत रद्द केली. यात कोणतेही राजकारण केले गेले नाही, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.