पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणी ज्या महालात वास्तव्य होते, तो लाल महाल अखेर पाच वर्षानंतर पुन्हा एकदा नागरिकांसाठी खुला झाला आहे. संभाजी ब्रिगेडसह अन्य शिवप्रेमी संघटनांकडून लाल महाल पर्यटकांसाठी सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानंतर अखेर पर्यटकांना लाल महालास भेट देता येणार आहे.
दुरुस्तीच्या नावाने पाच वर्षापासून होता बंद-
गेल्या काही वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली हा लाल महाल नागरिकांसाठी बंद होता, या महालाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने पाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार गेल्या काही काळापासून या दुमजली महालाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र पाच वर्षे होऊन देखील काम अद्याप संपलेले नाही. त्यामुळे पुण्यातील आणि पुण्या बाहेरून शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक लाल महाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत होती, अगदी शिवजयंती सह इतर शिवकालीन संदर्भ असलेल्या दिवसांना देखील लाल महाल उघडला जात नसल्याने शिवप्रेमी मध्ये नाराजी होती. याच संदर्भात संभाजी ब्रिगेडने महापालिकेतल्या सत्ताधार्याकडे पाठपुरावा केला होता.
शिवप्रेमीकडून सातत्याने होत असलेली मागणी लक्षात घेऊन अखेर मंगळवारपासून महापालिका प्रशासनाने लाल महाल नागरिकांसाठी खुला केला आहे. महाराजांचे बालपण या महालात गेले या महालाशी संबंधित अनेक शिवकालीन ऐतिहासिक घटना आहेत, ज्यात राजमाता जिजाऊंनी बाल शिवबाला घेऊन सोन्याच्या नांगराने पुण्याची जमीन नांगरली होती. त्या घटनेवर आधारित आकर्षक शिल्प या महालात आहे, याच महालात महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट तोडण्याचा पराक्रम केला होता, त्या इतिहासाची साक्ष असलेला लाल महाल खुला झाल्याने शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.