पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. या वास्तूमुळे पुणे शहर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट होते. अश्मयुगापासून मानवाच्या पाऊलखुणा पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात सापडतात. या वास्तू पाहण्यासाठी आजही मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.. त्यातील काही ऐतिहासिक वास्तूंचा हा घेतलेला आढावा
सारसबाग
पुण्यातील सारसबाग उद्यान एक महत्त्वाचे पर्यटनाचे ठिकाण मानले जाते. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या या या बागेतील गणेशाची स्थापना पेशवाईत झाली आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कार्यकाळात 1750मध्ये एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले होते. या तलावाच्या मध्यभागी एक बेट तयार करून त्या बेटावर 1784 साली सवाई माधवराव पेशवे यांनी मंदिर बांधून त्या ठिकाणी सिद्धिविनायकाची स्थापना केली.
पर्वती
मुळा-मुठा नदीच्या संगमावर वसलेल्या पुणे शहरात अनेक छोट्यामोठ्या टेकड्या आहेत आणि या टेकड्यांना तेवढेच ऐतिहासिक महत्त्वही आहे..यातील एक ऐतिहासिक टेकडी म्हणजे पर्वती टेकडी. थोरले बाजीराव पेशवे यांची पुत्र नानासाहेब पेशवे यांनी 1749साली ही टेकडी वसवल्याची नोंद आहे. या टेकड्यांवर पेशवेकालीन देवदेवेश्वर मंदिरही पाहायला मिळते. त्याशिवाय या टेकड्यांवर पेशवेकालीन कार्तिक स्वामी मंदिर, श्री विष्णू मंदिर, होम शाळा आणि इतर इमारती पाहायला मिळतात.. 1761 साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठी सैन्यांचा पराभव झाल्यामुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचा पर्वतीवर मृत्यू झालाय..
त्रिशुंड गणपती मंदिर
ऐतिहासिक वारसा असलेल्या पुणे शहरात अनेक प्राचीन देवस्थान आहेत त्यापैकी एक म्हणजेच त्रिशुंड गणपती मंदिर.. पुणे शहराच्या सोमवार पेठेत वसलेले हे गणपती मंदिर सतराव्या शतकातील आहे. पेशव्यांच्या काळातील हे मंदिर म्हणजे शिल्पांचा खजिना. या मंदिराच्या वेगवेगळ्या भागात कोरलेली शिल्पे पाहणाऱ्यांचे डोळे दिपवून टाकतात. 1754मध्ये हे मंदिर बांधल्याची नोंद इतिहासात आहे.
पाताळेश्वर
पुणे शहराचा शिवाजीनगर भागात वसलेलं पाताळेश्वर हे एक अतिप्राचीन देवस्थान आहे. आठव्या शतकात लेण्याचा स्वरूपात खोदून देवस्थान घडवले असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. पाताळेश्वर मंदिर एका मोठ्या कातळात खोदकाम करून निर्माण केलेले आहे. या मंदिरात राम-सीता-लक्ष्मण, लक्ष्मी आणि गणेश या देवतांच्या मूर्ती आढळतात.. पाताळेश्वर लेणी हे जमिनीचा खाली जमीन खोदून बांधण्यात आलेले आहे. मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप असून नंदी मंडपाचे छत प्रचंड मोठे आणि दगडाचे आहे. पेशवे काळात या मंदिराची नोंद असते मंदिराला दक्षिणा दिल्याचा उल्लेखही आढळतो. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेण्यांमध्ये साम्य आढळते. भारत सरकारने या पाताळेश्वर लिहिलेला 1909साली राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
शनिवारवाडा
पहिला बाजीराव पेशवा यांनी 1736साली शनिवारवाडा बांधल्याचा उल्लेख आढळतो. हा वाडा पेशव्यांचे राहण्याचे मुख्य ठिकाण होते. भगवा झेंडा ते युनियन जॅक फडकवताना या वाड्याने अनुभवले आहे. या वाड्याने अनेक घटना दुर्घटना पहिल्या आहेत. पानिपतचे युद्ध, नारायणरावांचा खून, राघोबादादाची अटकेपार स्वारी असे अनेक प्रसंग या वाड्यात घडले आहेत. मराठेशाही अस्ताला जाऊन 1817साली या वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला.
1827साली लागलेल्या भीषण आगीत हा वाडा जळून खाक झाला. इंग्रजांनी या वाड्याचा उपयोग शासकीय कार्यालय, तुरुंग यासाठी केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. 1919मध्ये हा वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला.