पुणे - प्लेबॉय युनिटच्या पुण्यात दोन फ्रँचायजी दिल्यानंतर त्याची रॉयल्टी न देता एका हिंदी चित्रपट निर्मात्याची तब्बल ५८ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चित्रपट निर्माते पराग मधू संघवी (वय ४८, रा. अंधेरी पश्चिम) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सचिन जगदीशप्रसाद जोशी (रा. पवई, मुंबई) व इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून २०१६ ते आजपर्यंत हा गुन्हा घडला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हिंदी चित्रपट निर्माते आहेत. त्यांची प्लेबॉय ही अमेरिकेत कंपनी असून त्यांच्या फ्रँचायजी संघवी यांनी घेतल्या आहेत. त्यांनी बाणेर व कोरेगाव पार्क दोन फ्रँचायजी सचिन जोशी नामक व्यक्तीला दिल्या होत्या. त्यासाठी संघवी यांनी जोशी व वायकिंग मिडीया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे संचालक यांनी करार केला होता. या करारानुसार त्यांना फ्रँचायजी रॉयल्टी देणे अपेक्षित होते. पण, आरोपींनी २०१६ पासून नियमानुसार तक्रारदार यांना देणे असलेली रॉयल्टी दिली नाही. त्यामुळे ५८ कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज संघवी यांनी पुणे पोलिसांकडे दिला होता.
या अर्जाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली. त्यानंतर जोशी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक एच.एम. ननावरे हे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी आलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल केला असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.