पुणे - मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाले आहेत. शहर व ग्रामीण भागातील ओढे, नाल्यांनी नदीकाठच्या घरांना पाण्याने वेढा घातला आहे. तर अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यात सरासरी 53.50 टक्के पाऊस झाला आहे.
सर्वाधिक पाऊस झालेले तालुके
1) मुळशी - 134.83 सरासरी
2) भोर - 91.50 सरासरी
3) मावळ - 206.57 सरासरी
4) वेल्हा - 107 सरासरी
5) जुन्नर - 59 सरासरी
6) खेड - 42 सरासरी
7) आंबेगाव - 46 सरासरी
अतिवृष्टीमुळे झालेल्या घटना...
- आंबेगाव तालुक्यातील मौजे कोलतावाडे येथे गावाच्या रस्त्यावर दरड कोसळून मुख्य रस्ता बंद झाला होता. गावकऱ्यांनी दरड बाजूला हटवत रस्ता रहदारीसाठी सुरू केला आहे. तालुक्यातील मौज गाहे खुर्द, गोहे बु उगलेवाडी, डिंभे खुर्द, डिंभे बुद्रुक, कानसे या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे लगतच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी ओढ्यावरील पुलांचे नुकसान झालेले आहे. आंबेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी अथवा पशू हानी झालेली नाही.
- भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळून रस्त्यावर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने ही दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
- मावळ तालुक्यातील आपटी गेव्हांडे येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील माती बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.
- मौजे धामणी येथील पुलावरून पाणी जात असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
- वाडीवळे पूल व नाणे पुलावरून पाणी जात असल्याने दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
- मळवली स्टेशन जवळील ओशो आश्रमात पाणी गेले होते. परंतु सदर ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
- कामशेत ते नाने या रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
- देवले मलवती रस्ता पाण्याखाली गेला असल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
- कोळचाफेसर व मोरवे भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
- खेड - आरळा कळमोडी धरण 100 टक्के भरले असून आरळी नदीत 3 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठी राहणाऱ्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
- मौजे नायफड ता. खेड येथील मातीचा कच्चा बंधारा फुटला असून आजूबाजूचा भातशेतीचे नुकसान झाले आहे.
- मौजे खरोशी, भिवेगाव, शेंदुरली, नायफड, मंदोशी, पाभे, धुवोली, वांजळे, कुडे त्या गावातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा - चिपळूणमध्ये पूरस्थिती गंभीर; अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू, पुण्यातून NDRF रवाना