पुणे - वाघांची घटती संख्या आणि वन्य जीवांप्रति जागरूकता निर्माण व्हावी यासाठी 29 जुलैला व्याघ्र दिन साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या माध्यमातून व्याघ्र दिवस साजरा केला जातो. पुण्यातल्या कात्रज प्राणी उद्यानात असलेले वाघ या दिवसानिमित्त दत्तक घेऊन एका वेगळ्या पद्धतीने व्याघ्र दिवस साजरा करण्यात आला.
शिवसेनेचे हडपसर भागातील नगरसेवक नाना भानगिरे यांनी कात्रज उद्यानातील तानाजी या वाघाला 2 महिन्यांसाठी दत्तक घेतले आहे. या दोन महिन्यात तानाजी या वाघाला लागणारे अन्न तसेच औषध उपचाराचा खर्च भानगिरे करणार आहेत. वाघ दत्तक घेताना भानगिरे यांनी शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाची आक्रमकता यांची सांगड असल्याने वाघ दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
या निमित्ताने वाघ संरक्षण संवर्धनासाठी जागरूकता निर्माण व्हावी, असा ही उद्देश असल्याचे भानगिरे म्हणाले. एकीकडे व्याघ्र दिनाचा निमित्ताने भानगिरे हे वाघ दत्तक घेत असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीकडे त्यांचे लक्ष आहे. हडपसर मतदारसंघातून भानगिरे शिवसेनेतील प्रमुख इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या हा वाघ दत्तक घेण्याची चर्चा मतदारसंघात होत आहे.