पुणे:- बोगस एनए ऑर्डर व बांधकाम परवानगीच्या सहाय्याने अनधिकृत सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणांमध्ये 4 व्यक्तींना हडपसर पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. यात 2 बिल्डर तर 2 वकील यांचा समावेश आहे, अशी माहिती डिसीपी नम्रता पाटील यांनी दिली आहे.
पुण्यात गेल्या काही वर्षांपासून बनावट एनए ऑर्डर (बिगरशेती प्रमाणपत्र) आणि भोगवटापत्र तयार करून शेकडो सदनिकांची नोंदणी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने ६७ बनावट 'एनए ऑर्डर', तर महापालिकेच्या नावावर ३७ बनावट भोगवटा पत्र अशा सुमारे शंभरहून अधिक केसेस तपासणीत आढळून आल्या आहेत. यासाठी एजंटकडून चक्क विभागीय आयुक्त सौरभ राव आणि तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक एस. चोक्कलिंगम यांना प्रांताधिकारी म्हणून दाखवित त्यांच्या खोट्या सह्या करून बनावट एन.ए. आदेश तयार केले. यात 10 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्या आहेत. एजंट दुय्यम निबंधकांच्या संगनमताने बोगस दस्त नोंदणीदेखील झाली आहे. या प्रकरणात आत्ता तक्रार दाखल झाली असून हडपसर पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे. 4 जणांना केली अटक
स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने 3 महिन्यांपूर्वी मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांना याबाबत पत्र देण्यात आलं होतं. यानंतर चौकशी केली असता हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, 4 जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही एजंटवर कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा - Stolen Sixteen Lakh : एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्याने लुटले सोळा लाख रुपये