पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोड्या करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट पाचने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण 47 लाख 50 हजारांचे तब्बल 95 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या दरोडेखोरांच्या टोळीत महिलांचा सहभाग असल्याचे समोर आले असून त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. घरांवर लक्ष करून खिडकीचे गज कापून दरोडेखोर घरात प्रवेश करत आणि सोने, पैशांचा ऐवज घेऊन पोबारा करत होते. लिंग्या उर्फ अजित पवार, आप्पा भोसले, सारिका चौगुले, अक्षय शिंदे, अजय रिका उर्फ राहुल पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लिंग्या पवारकडून 33 तोळे सोन्याचे दागिने जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीतील एक आरोपी हा औरंगाबाद येथे असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली. त्यानुसार, औरंगाबाद येथे वेषांतर करून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी लक्ष ठेवून आरोपी लिंग्या पवारला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून 33 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
एका महिला आरोपीलाही बेड्या
इतर आरोपी हे अक्कलकोट, सोलापूर, उस्मानाबाद आणि करमाळा येथील जंगलात वास्तव्यास असल्याचे समोर आले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम इंगवले यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांचे चार पथक त्या ठिकाणी पाठवत जंगलात लपून बसलेल्या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यात एका महिलेचा सहभाग असून इतर काही महिला फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून 47 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
हेही वाचा - पुण्यातील व्यापाऱ्याकडून 130 कोटीचा घोटाळा; जीएसटी विभागाकडून अटक