राजगुरुनगर (पुणे) : पुणे-नाशिक महामार्गावर आज (शनिवार) सकाळच्या सुमारास मालवाहतुक ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह गाडीचा क्लिनर गंभीर जखमी झाला असुन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चाकण नजिक असलेल्या खरपुडी फाट्यावर हा अपघात झाला.
लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर पुणे-नाशिक मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु आहे. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा अपघातांची मालिका सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. खरपुडीकडे जाणाऱ्या मार्गावर आणि परिसरात सातत्याने अपघात होत असतात. वाहतूक पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा - नागपुरात ऑटोरिक्षांवर लागला क्यूआर कोड, एका क्लिकवर ऑटोची संपूर्ण माहिती
पुण्याहून नाशिकच्या दिशेने आज सकाळच्या सुमारास इलेक्ट्रॉनिक रोहित्रांचे साहित्य घेऊन एक मालवाहतूक ट्रक जात होता. खरपुडी फाट्याजवळ चालकाचे ट्रॅकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. खरपुडी येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमी व्यक्तींना ट्रकमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.