पुणे - देशात गेल्या आठवड्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. या वाढीविरोधात माल वाहतूक आक्रमक झाले असून, अशीच दरवाढ होत राहिली, तर देशपातळीवर मालवाहतूकदारांचा चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा ( Freight carriers warn strike ) ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट माल वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला.
हेही वाचा - पुण्यात महिलांवरील अत्याचार वाढला.. 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग, तर 19 वर्षीय तरुणीवर अश्लील कृत्य
कोरोनाच्या काळात देशातील माल वाहतूकदारांनी अत्यंत चोखपद्धतीने जबाबदारी पार पाडली. देशातील सर्व ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून या माल वाहतूकदारांनी आपली जबाबदारी पार पाडली. पण, गेल्या 8 दिवसांपासून डिझेलच्या किंमतीत 80 ते 85 पैसे प्रति लिटर वाढ होत आहे. याचा फटका देशातील पाऊनेदोन कोटी माल वाहतूकदारांना बसत आहे. ज्या पद्धतीने डिझेलचे भाववाढ होत आहे त्याच पद्धतीने मालवाहतूकचे भाडे वाढत नाही आहे आणि याचा फटका हा माल वाहतूकदारांना बसत आहे. म्हणून लवकरच संघटनेची बैठक घेऊन देशव्यापी चक्काजाम आंदोलनाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती यावेळी बाबा शिंदे यांनी दिली.
सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. पण, भाडेवाढ होत नाही आहे, त्यामुळे मालवाहतूकदारांना मिळणाऱ्या नफ्याचे नुकसानीत रुपांतर होत आहे. म्हणून अनेक मालवाहतूकदारांच्या गाड्या गेल्या काही दिवसांपासून जागेवरच उभ्या आहेत. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कृपेने अनेक नवनवीन टॅक्स मालवाहतूकदारांच्या गळ्यात आल्याने याचा फटका देखील या मालवाहतूकदारांना बसत आहे, असे देखील यावेळी बाबा शिंदे म्हणाले.
हेही वाचा - VIDEO : पाणीटंचाईच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन