पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात एकूण चार जणांना करोना विषाणूची बाधा झाली असून यात ४ वर्षीय चिमुकली आणि गर्भवती महिलेला करोना झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४५ झाली असून इतर तीन जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १२ जणांना करोनामुक्त करण्यात आले असून ३३ जणांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. आजदेखील शहरात चार करोनाबाधित रुग्ण आढळले असून यात ४ वर्षीय चिमुकली आणि एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. या दोघींवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित महिलांना त्यांच्या परिसरातील करोनाबाधित व्यक्तीमुळे करोना झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे सर्व बाधित खराळवाडी आणि भोसरी परिसरातील आहेत. यातील या अगोदरच काही भाग पोलिसांकडून सील करण्यात आले आहेत. मात्र, सर्व नागरिकांनी करोनासंबंधित योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.