पुणे - शहरातील सुखसागर नगर परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याने आपल्या दोन लहान मुलांना गळफास देऊन स्वतःही आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला आहे. अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 30) , ॠवेद अतुल शिंदे (वय6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी मृत्यांची नावे आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसागर नगर, वाघजाईनगर लेन नंबर एकमध्ये हे दाम्पत्य वास्तव्यास होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने दोन दिवसांपासून त्यांच्या घरात कुठलीही हालचाल होत नसल्याचे पाहून पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडून पाहिले असता, घरातील चौघेही सिलिंग फॅनच्या हुकला लटकलेक्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना खाली उतरून ससून रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले.
भिंतीवर लिहले कारण..
या दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी घराच्या भिंतीवर कारण लिहून ठेवले आहे. 'कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये. आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवित आहोत' असे घराच्या भिंतीवर लिहिलेले आढळले. त्याखाली दोघा पती पत्नीच्या सह्या आहेत.
प्राथमिक माहितीत या कुटुंबाचे प्रमुख अतुल शिंदे हे ओळखपत्रे बनवून देण्याचे काम करत होते. त्यावरच त्यांची उपजीविका चालायची. मात्र गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांचा व्यवसाय बंद होता. त्यामुळे व्यवसाय बंद असल्याने आर्थिक हलाखीमुळे या कुटुंबाने जीवन संपवल्याचे त्यांनी लिहिलेल्या संदेशातून अधोरेखित होत आहे.