पुणे - अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेचा विचार करतच सरकारने अमरनाथ यात्रा थांबवली आहे ,असे माजी लष्करी अधिकारी ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांनी सांगितले आहे. तसेच काश्मीर खोऱ्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले असल्याचेही हेमंत महाजन यांनी सांगितले आहे.
हेमंत महाजन म्हणाले, की अमरनाथ यात्रा ही 15 ऑगस्टपर्यंत चालणार होती. मात्र, सरकारने ही यात्रा थांबवली. मागील काही दिवसांपूर्वी सरकारने काश्मीर खोऱ्यात 100 अर्ध लष्करी दलाच्या तुकड्या पाठवल्या होत्या. त्याचे कारणही अमरनाथ यात्रेकरूंची सुरक्षा हेच होते.
काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून दहशतवादविरोधी अभियान राबवण्यात येते. या अभियानादरम्यान स्निफर रायफल माईन्स आयडी मोठ्या प्रमाणात लष्कराच्या हाती लागले आहेत. त्यामुळे या यात्रेदरम्यान घातपाताची मोठी शक्यता होती. त्यामुळे घातपाताची भीती लक्षात घेऊनच सरकारने या प्रदीर्घ चालणाऱ्या यात्रेच्या संरक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही यात्रा थांबवली असल्याचे हेमंत महाजन यांनी सांगितले.