पुणे - राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले माफ करावीत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राज्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राज्यात वाढीव वीज बिलाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात पेटू लागला आहे. एकीकडे भाजप राज्य सरकारला वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडत आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात सर्वच घरी असल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन काळातील बिले माफ करावीत अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
ऊर्जा मंत्र्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता तर मोफत विजेची घोषणा का केली?
राज्यात 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली होती. आणि आता तेच म्हणत आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये वीजबिल भरावे लागणार आहे. जर त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता तर मग त्यांनी घोषणा का केली? असा सवालही यावेळी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 23 तारखेपासून पायी मोर्चा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 23 ते 25 नोव्हेंबरला सातारा ते कराड असा पायी मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने वारंवार केंद्र आणि राज्य सरकारला निवेदने देण्यात आली आहेत, निवेदने देऊनही शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या कृतीचा निषेध करण्यासाठी हा पायी मोर्चा काढण्यात येत असल्याचेही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
राज्यपाल उमेदवारांच्या नियुक्तीसाठी वेळ का लावत आहेत?
राज्यातील राज्यपाल नियुक्त जागांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. राज्यपाल याबाबत वेळ का लवत आहेत, असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. जर राज्यपालांचा काही आक्षेप असेल तर त्यांनी तो सांगावा, असेही शेट्टी यावेळी म्हणाले. दरम्यान राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारांमध्ये राजू शेट्टी यांच्या नावाचा देखील समावेश आहे.
हेही वाचा - बारामतीत ‘एक गाव, एक दिवस’ या उपक्रमाचे कौतुक..
हेही वाचा - 'कोथिंबीर'ला कवडीमोल भाव; शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात सोडल्या मेंढ्या